अवंतीपोरा (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरा येथील पदगामपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला, तर सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. वृत्तानुसार, लष्कर, सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि पोलिसांनी पदगामपोरा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली तेव्हा ही चकमक झाली.
एक अतिरेकी ठार : परिसरात काही अतिरेकी लपले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे शोध मोहीम सुरू केली. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली, असे सूत्रांनी सांगितले. या गोळीबारात लष्कराच्या दोन जवानांना गोळ्या लागल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, काश्मीर पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या चकमकीत एक अतिरेकी मारला गेला आहे. चकमक अजूनही सुरू असून दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
काश्मिरी पंडिताची हत्या : गेल्या रविवारीच अतिरेक्यांनी पुलवामा जिल्ह्यातील अचन गावात खोऱ्यातील एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. चाळीस वर्षीय संजय शर्मा यांची पॉइंट ब्लँक रेंजवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शर्मा हे एका बॅंकेत सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करायचे. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास स्थानिक बाजाराजवळ घडली. तेथील स्थानिक नागरिकांनी शर्मा यांच्या हत्येविरोधात निदर्शने केली. त्यांनी परिसरात सामान्यता आणि शांतता पूर्ववत करण्यासाठी घोषणा दिल्या.