श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी अटक ( LeT hybrid terrorist ) केली. ही अटक बांदीपोरा येथील नदीहाल परिसरातून करण्यात आली. दहशतवाद्याला पकडल्यानंतर सुरक्षा दलांनी स्फोट करून त्याचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले असून, त्याचे व्हिडिओ फुटेज जारी करण्यात आले आहे. जम्मू आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळाही जप्त केला आहे.
एका विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत बांदीपोराच्या पाचनमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला पकडण्यात आले. या कारवाईत बांदीपोरा पोलीस, 14 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची तिसरी बटालियन सहभागी झाली होती. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मेहबूब-उल-इनाम उर्फ फरहान असे आहे, तो इनाम-उल-हक शाहचा मुलगा असून, बांदीपोरा येथील नदिहाल येथील रहिवासी आहे. आरोपीने आपल्या स्कूटीमध्ये चायनीज ग्रेनेडही लपवून ठेवले होते.