नवी दिल्ली Jairam Ramesh on Milind Deora : 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. या राजीनामाच्या घोषणेची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवली होती, अशी टीका कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलीय. गेल्या शुक्रवारीच देवरा यांच्याशी फोनवर चर्चा झाली होती आणि त्यांना पक्षाचे नेते राहुल गांधी यांना भेटायचं होतं. ते त्यांच्या पूर्वीच्या लोकसभा जागेसाठी (दक्षिण मुंबई) आग्रही होते, असंही कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलंय. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत.
राजीनाम्याची वेळ मोदींनी ठरवली : जयराम रमेश यांनी आरोप केला की, "मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेची वेळ स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठरवलीय. देवरांनी मला शुक्रवारी सकाळी 8:52 वाजता मेसेज केला. त्याच दिवशी दुपारी 2:47 वाजता मी उत्तर दिलं. त्यांना विचारलं, तुम्ही पक्ष सोडण्याचा विचार करत आहात का? मग दुपारी 2.48 वाजता त्यांनी मेसेज केला की मी तुमच्याशी बोलू का? मी त्यांना सांगितलं की, मी तुम्हाला कॉल करेन. त्याच दिवशी मी त्यांच्याशी 3:40 वाजता बोललो."