हैदराबाद Michaung Cyclone : दक्षिण भारतात मिचॉन्ग चक्रीवादाळाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाला याचा सर्वाधिक फटका बसला. सर्वाधिक नुकसान चेन्नईत झालं आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नईचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय. यामुळे शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण आठ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, दक्षिण भारतात हाहाकार माजवणाऱ्या या चक्रीवादळाचं नाव 'मिचॉन्ग' का आहे? वादळाला हे नाव कोणी दिलं? तर आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती सांगतो.
म्यानमारनं दिलं नाव : या चक्रीवादळाचं 'मिचॉन्ग' हे नाव म्यानमारनं प्रस्तावित केलं होतं. हे लवचिकता आणि चिकाटीचं प्रतीक आहे. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) नुसार, हा म्यानमारच्या भाषेतील शब्द आहे. याला 'मिग्जोम' असंही म्हणतात. या वर्षी, हिंदी महासागरात तयार होणारं हे सहावं आणि बंगालच्या उपसागरात तयार होणारं चौथं चक्रीवादळ आहे.
ओडिशाला धडकण्याची शक्यता : मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाला बसल्यानंतर आता ते ओडिशाला धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय हवामान खात्यानं आधीच अंदाज वर्तवला होता की, रविवारी ३ डिसेंबर रोजी दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार होऊ शकतं. दुसऱ्या दिवशी, चक्रीवादळ मिचॉन्ग तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचण्याचा अंदाज होता. मिचॉन्गमुळे चेन्नईत जोरदार पाऊस झाला असून शहरातील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. या भागात पाण्याची पातळी वाढल्यानं चेन्नई विमानतळ सोमवारी रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवावं लागलं.
अनेक उड्डाणं रद्द : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईला ये-जा करणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीत. हवामानाची परिस्थिती पाहता अनेक उड्डाणं वळवण्यात आली आहेत. या भीषण चक्रीवादळामुळे चेन्नईच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं असून, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आहेत. यामुळे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा :
- दक्षिण भारताला बसणार 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा तडाखा; सरकार अलर्टवर, NDRF तैनात
- मिचॉन्ग चक्रीवादळाचा थेट परिणाम विदर्भावर जाणवणार; वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याचा अंदाज