नवी दिल्ली Michaung Cyclone : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांकडून मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गृहमंत्र्यांनी राज्यांना केंद्राकडून सर्व आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांची पुरेशी तैनाती करण्यात आली असून अतिरिक्त पथकं आणखी मदतीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
एनडीआरएफची तैनाती : चक्रीवादळाच्या तयारीबाबत गृहमंत्र्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 'नागरिकांचं प्राण वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले. "केंद्र सरकार आंध्र प्रदेशला आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार आहे. एनडीआरएफ आधीच तैनात करण्यात आलं असून, आवश्यकतेनुसार आणखी टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत", असं त्यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या दक्षिण भागात घिरट्या घालणाऱ्या 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. चक्रीवादळ हळूहळू तीव्र होऊन उत्तरेकडे आंध्र प्रदेशच्या किनार्याजवळ सरकण्याची शक्यता आहे. ते नेल्लोर आणि मछलीपट्टणममधील बापटलाजवळून जाईल.