नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील रिक्त पदांवर माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या सोबतच मंत्रालयाने उच्च वयोमर्यादेत देखील शिथिलता दिली आहे. ही सूट हे अग्निवीर पहिल्या बॅचचे आहेत की त्यानंतरच्या बॅचचे भाग आहेत यावर अवलंबून असणार आहे.
10 टक्के रिक्त पदे माजी कर्मचार्यांसाठी राखीव : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, 1968, (1968 चा 50) अंतर्गत केलेल्या नियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर अधिसूचनेद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. अधिसूचनेत नमूद केले आहे की, 10 टक्के रिक्त पदे माजी कर्मचार्यांसाठी राखीव असतील. यावर मंत्रालयाने सांगितले की, माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाणार आहे.
शारीरिक कार्यक्षमता चाचणीतूनही सूट : माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतूनही सूट देण्यात येईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात 17 ते साडे 21 वयोगटातील तरुणांची भरती करण्यासाठी केंद्राने गेल्या वर्षी 14 जून रोजी महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत भरती झालेल्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाणार आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक बॅचमधील 25 टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.