श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये गुपकर अलायन्सला चांगला पाठिंबा मिळाला. त्यानंतर आज (बुधवार) पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. काश्मीर सरकारवरही त्यांनी टीका केली. लढायचं असेल तर राजकीय मार्गानं लढा, ईडीच्या माध्यमातून नको, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ राज्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद
माझ्या जवळ लपवण्यासाठी काहीही नाही - मुफ्ती
केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला आपल्या हातातील खेळण बनवलं आहे. माझ्याबरोबर लढायचं असेल तर राजकीय मार्गाने लढा, ईडीच्या माध्यमातून लढू नका. माझ्या जवळ लपवण्यासाठी काहीही नाही. दहशतवादाला निधी पुरवणाच्या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांना यश आले नाही. आम्ही फक्त ६० जागांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्यातील ३० जागा जिंकल्या. त्यामुळे भाजपा आत्ता घाबरली असून विधानसभा निवडणुका इतक्या लवकर घेणार नाही, असे त्या म्हणाल्या.