शिलाँग - मेघालयमधील भाजपा सरकारच्या एका मंत्र्यांनी गोमांसासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री सानबोर शुलाई यांनी लोकांना चिकन-मटनपेक्षा जास्त गोमांस खावे, असा सल्ला दिला आहे. देशभरात गोमांसवर बंदी घालण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आता त्यांच्याच मंत्र्यांने चिकन-मटनपेक्षा जास्त गोमांस खावे, असे म्हंटल्याने भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
आपल्या देशात लोकशाही आहे. प्रत्येक जण आपल्या मर्जीचं खाणं खाण्यासास मुक्त आहे. त्यामुळे नागरिकांनी चिकन, मटण आणि मासे खाण्याऐवजी जास्त गोमांस खावे. यासाठी कोणावरही दबाव नाही. मी लोकांना गोमांस खाण्यासाठी प्रेरित करतो. यामुळे भाजपा गोहत्या बंदी करेल ही धारणादूर होईल, असे ते म्हणाले.
सानबोर शुलाई यांनी यांनी गेल्या आठवड्यातच कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतरच्या काही दिवसातच त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे त्यांनी पक्षासमोर मोठी अडचण निर्माण केली आहे. दरम्यान, पक्षाच्यावतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एवढेच नाही, तर मेघालयातील गुरांच्या वाहतुकीवर आसाममध्ये नुकतेच तयार करण्यात आलेल्या 'आसाम गाय संरक्षण विधेयक, 2021' कायद्याचा परिणाम होणार नाही, याची खात्री करण्यासाठी आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याशी बोलणार असल्याचे शुलाई यांनी सांगितले.
नुकतेच आसाममध्ये 'आसाम गाय संरक्षण विधेयक, 2021' विधेयक लागू करण्यात आले आहे. या कायद्यात गायींच्या संरक्षणाशी संबंधित कडक नियम घालून देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास एखाद्या व्यक्तीला कमीतकमी 3 वर्षांची शिक्षा होईल. जी 8 वर्षांपर्यंत वाढवता येईल. तर 3 लाखांचा दंड देखील आहे. जो जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंत जाऊ शकतो. ईशान्येकडील राज्ये सोडली गेली, तर देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात गोहत्येसंदर्भात कायदे आहेत. काही राज्यात कायदे अधिक कडक आहेत. कडक कायदे असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, यूपी, दिल्ली आणि हरियाणा यांचा समावेश आहे.