हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातील पाच राज्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदी बढती दिली आहे. त्यांच्याकडे नवीन मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. पाहू, बढती मिळालेले हे पाच केंद्रीय मंत्री.
- हरदीप सिंग पुरी- दिल्लीमध्ये जन्मलेले हरदीप सिंग पुरी हे माजी राजदूत आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालय आणि गृहबांधणी म्हणून राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलेले आहे. त्यांनी यापूर्वी भारतीय पराष्ट्र मंत्रालयात अधिकारी म्हणून काम केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी समितीचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे.
- किरेन रिजिज्जू- ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधीत्व करणारे म्हणून किरेन रिजिज्जू यांची ओळख आहे. ते अरुणाचल प्रदेशमधील खासदार आहेत. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. यापूर्वी त्यांनी २०१४ ते २०१९ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद भूषविले होते. ते सातत्याने देशात क्रीडा प्रसारासाठी सक्रिय असतात.
- मनसुख मांडवीय- गुजरातमधील राज्यसभेचे खासदार मनसुख मांडवीय यांच्याकडे जहाज बंदरे, जहाबांधणी, जलवाहतूक या मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी होती. गुजरातमधील गावांमध्येही त्यांची जनजागृतीपर भाषणे लोकप्रिय आहेत. गुजरातमध्ये सर्वात कमी वयात आमदार होण्याची कामगिरीही त्यांनी केलेली आहे.
- जी. किशन रेड्डी-
गंगापुरम किशन रेड्डी हे सिकदंराबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा जन्म तेलंगाणामधील रंगारेड्डी येथे झाला. त्यांची तेलंगाणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी त्यांनी आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपसाठी झोकून काम केले. तेलंगाणामध्ये २२ दिवसांची पोरू यात्रा त्यांनी काढली होती. ही यात्रा ३५०० किलोमीटरची होती. या यात्रेत ९८६ गावे आणि ८८ विधानसभा मतदारसंघ रेड्डी यांनी पिंजून काढले.
- परशोत्तम रुपाला
केंद्रीय पंचायत राज, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून परशोत्तम रुपाला यांनी काम केले आहे. रुपाला यांची गुजरातमधून राज्यसभेवर नियुक्ती झालेली आहे. त्यांचा संसदेच्या अनेक समित्यांमध्ये सहभाग आहे. गुजरातमध्ये तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. गुजरातमध्ये परशोत्तम रुपाला यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
- अनुराग ठाकूर - अर्थव्यवस्था मंदावली असताना त्यांनी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते हमरिपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करता. दुर्गम भागातही त्यांनी सैन्यलात अधिकारी म्हणून काम केले आहे. अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआय आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशियनचे प्रमुखही होते.