कोलकाता Medical Miracle : पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये एक चमत्कारीक घटना घडली आहे. येथे गर्भात जुळं असलेल्या महिलेचं पहिलं बाळ दगावल्यानंतर डॉक्टरांनी तब्बल १२५ दिवसांनी महिलेच्या दुसऱ्या बाळाची सुरक्षित प्रसूती केली. अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं हा वैद्यकीय चमत्कार समजला जातोय. या महिलेची सुरक्षित प्रसूत करण्यास डॉक्टरांना १४ नोव्हेंबरला यश आलं. सध्या बाळ आणि माता दोघही सुरक्षित आहेत.
एक अर्भक आधीच मृत पावलं होतं : वर्धमान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ४१ वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महिला जुलै महिन्यात हॉस्पिटलमध्ये आली होती. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर तिच्या पोटात जुळी मुलं असल्याचं स्पष्ट झालं. मात्र दुर्दैवानं गर्भातील एक अर्भक आधीच मृत पावलं होतं. गुंतागुंतीमुळे नेव्हिगेट करण्यासाठी वैद्यकीय पथकानं मृत बाळाला जन्म देण्याचा पर्याय निवडला. डॉक्टरांनी गर्भाशयात दुसरा गर्भ पुनर्स्थापित केला. डॉक्टरांसमोर हे एक मोठं आव्हान होतं. पहिलं बाळ पोटात दगावल्यानं निरोगी बाळाच्या नैसर्गिक प्रसूतीदरम्यान संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी मोठी जोखीम पत्करत दुसऱ्या बाळाची प्रसूती नैसर्गिक होईल, यावर भर दिला.
१२५ दिवस निगराणी केली :गर्भवती महिलेला डिस्चार्ज देण्याऐवजी तिच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून उपचार करण्यासाठी एक विशेष वैद्यकीय पथक तयार करण्यात आलं. उपचार सुरू करुन या महिलेला १२५ दिवस रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. १४ नोव्हेंबर बालदिनी वैद्यकीय पथकानं दुसऱ्या बाळाची सिझेरियनद्वारे यशस्वी प्रसूती केली. नवजात बाळाचं वजन २.९ किलो असून बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. १२५ दिवस गर्भ टिकून राहणं हा वैद्यकीय चमत्कार असल्याचं बोललं जात आहे. वर्धमान वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयानं ही यशस्वी प्रसूती करुन या अगोदरचा रेकॉर्ड मोडला.