लखनऊ (उत्तरप्रदेश) : राजधानी लखनऊच्या सरोजिनी नगर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या सीएसएम मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद परिस्थितीतून नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. नवव्या मजल्यावरून विद्यार्थिनी पडल्याच्या वृत्ताने वसतिगृहात एकच खळबळ उडाली असून, माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
विद्यार्थिनी रक्तभंबाळ अवस्थेत पडली :पोलिसांनी विद्यार्थिनीच्या मृतदेहाला सील करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. विद्यार्थिनी राहायला असलेल्या वसतिगृहातील लोकांची चौकशी करून घटनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. मूळची बिहारची रहिवासी असलेली एमबीबीएसची विद्यार्थिनी मेडल सिंग ही सरोजिनी नगर येथील टीएस मिश्रा मेडिकल कॉलेज शिकत होती. ती अमौसी येथील गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायला होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुलींच्या वसतिगृहातून अचानक ओरडण्याचा आवाज आला. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी जवळ जाऊन पाहिले असता एक विद्यार्थिनी रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडली होती.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला:मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती मिळताच वसतिगृहात एकच खळबळ उडाली. वसतिगृहातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाल्या. टीएस मिश्रा प्रशासनाने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी एसीपी कृष्णनगर विनय कुमार द्विवेदी यांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूला उपस्थित विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि पंचनामा करून विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या ही विद्यार्थिनी अचानक बाल्कनीतून खाली कशी पडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.