श्रीनगर (जम्मू काश्मीर): जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील 'गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्ट'च्या उच्च उंचीच्या भागात बुधवारी मोठे हिमस्खलन झाले. हिमस्खलनामुळे दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 19 परदेशी नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बारामुल्ला जिल्हा पोलिसांच्या प्रवक्त्याने ट्विट केले की, 'गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट हापथखुद या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले. बारामुल्ला पोलिसांनी इतर यंत्रणांसह बचावकार्य सुरू केले होते. सर्व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
कारगिलपासून ७८ किमी अंतरावर:अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन परदेशी नागरिक स्कीईंगला आलेले आणि दोन मार्गदर्शक बेपत्ता झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. याआधी रविवारी कारगिल जिल्ह्यातील टांगोले गावात हिमस्खलनामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला होता. या अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव कुसुम असून ती 11 वर्षांची होती, तर दुसर्या मुलीचे नाव बिल्किस असून ती 23 वर्षांची होती. टांगोले हे झानस्कर महामार्गावर कारगिलपासून सुमारे 78 किलोमीटर अंतरावर आहे.
यापूर्वी इतर ठिकाणीही झाले हिमस्खलन:तसेच, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील एका गावाव्यतिरिक्त सोनमर्गमधील सरबल कॉलनीमध्येही हिमस्खलन झाले. परंतु यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज दुपारी गुरेझच्या जुन्नियाल गावात हिमस्खलन झाले, मात्र त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. यानंतर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (SDMA) उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यासाठी उच्च-धोक्याचा हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. तसेच बांदीपोरा, बारामुल्ला, डोडा, गंदरबल, किश्तवार, पूंछ, रामबन आणि रियासी जिल्ह्यांसाठी मध्यम-धोक्याचा हिमस्खलन इशारा देण्यात आला आहे.