टिकमगड (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील 3 जणांचे मृतदेह रेल्वे रुळावर पडलेले आढळले. शुक्रवारी सकाळी पती, पत्नी व मुलीचे मृतदेह एकत्र आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत मृताच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस कर्मचाऱ्याने कुटुंबप्रमुखाला धमकावले होते, त्यानंतर त्याने हे भयंकर पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
कमलनाथ यांनी केली चौकशीची मागणी : टिकमगढच्या खरगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मातौल गावातील रहिवासी लक्ष्मण यांनी कुटुंबासह आत्महत्या केली. यामध्ये पती, पत्नी आणि मुलगी यांचा मृत्यू झाला, मात्र मुलगा घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना खरगापूर रेल्वे रुळावर शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. रुळावर पडलेले मृतदेह पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना वाचलेल्या मुलानेच पोलिसांना कळवण्याची विनंती केली होती. मुलाने पोलिसांना सांगितले की, 'पोलिसांकडून त्याच्या वडिलांना धमकावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले'. आता या प्रकरणावर कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.