चंडीगढ - पंजाब हरियाणा हायकोर्ट शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीवर निर्णय देताना म्हटले की, मुस्लिम मुलगी हिंदू मुलाचे लग्न धर्मांतर केल्याशिवाय कायदेशीर दृष्ट्या वैध ठरू शकत नाही. उच्च न्यायालयाने हे सुद्धा स्पष्ट केले की, दोघेही सज्ञान पाहिजेत त्याचबरोबर न्यायालयाने म्हटले आहे, की असे जोडपे विवाहासारखे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात.
याचिका दाखल करताना प्रेमी युगुलाने उच्च न्यायालयाला सांगितले की, मुस्लिम मुलीचे वय १८ वर्ष तर हिंदू मुलाचे वय २५ वर्ष आहे. दोघांनी हिंदू रीति-रिवाजानुसार १५ जानेवारी रोजी शिव मंदिरात लग्न केले होते. विवाह केल्यानंतर दोघांच्या जीवाला त्यांच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या संरक्षणासाठी याचिकाकर्त्यांनी अंबालाच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर प्रेमी युगुलाने उच्च न्यायालयाचा दरवाजा खटखटला.