पेशावर : पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा प्रांतात सोमवारी एका पोलीस ठाण्यावर हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या आत्मघातकी हल्ल्यात आठ पोलिसांसह किमान 10 नागरिक ठार आणि 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तानमध्ये माध्यमांनी दिली आहे.
कबाल पोलीस ठाण्यात झाला हल्ला :स्वात खोऱ्यातील कबाल पोलीस ठाण्यामध्ये हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवादविरोधी विभाग आणि मशीदही आहे. हल्ल्यानंतर संपूर्ण प्रांतात सुरक्षा अधिकारी 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आल्याची माहिती खैबर पख्तुनख्वाचे पोलीस महानिरीक्षक अख्तर हयात खान यांनी दिली. सोमवारी स्वातच्या कबाल येथील दहशतवादविरोधी विभाग (CTD) पोलीस स्टेशनवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात आठ पोलिसांसह किमान 10 जण ठार झाले. त्यासह 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या हवाल्याने एका माध्यमाने दिली आहे.
दोन स्फोट झाल्याने इमारत झाली उद्ध्वस्त :तालिबानने सरकारशी युद्धविराम संपल्यानंतर अलीकडच्या काही महिन्यात अशाच हल्ल्यांचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणी स्वीकारली नाही. पोलीस ठाण्याच्या आत दोन स्फोट झाले, त्यामुळे इमारत उद्ध्वस्त झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी शफी उल्लाह गंडापूर यांनी दिली. या इमारतीखाली नागरिक दबले असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली दबले नागरिक :पोलीस ठाण्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. पोलीस ठाण्याची इमारत या हल्ल्याने उद्ध्वस्त झाली असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यातील जखमींना सैदू शरीफ टीचिंग हॉस्पिटलमध्ये नेले जात आहे. दरम्यान, आजूबाजूच्या सर्व रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी स्फोटाचा निषेध करत जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. लवकरच दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईल, असे ते म्हणाले आहेत. खैबर पख्तुनख्वाचे कार्यवाहक मुख्यमंत्री मुहम्मद आझम खान यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - Kedarnath Dham Door Open : बाबा केदारनाथांचे दरवाजे उघडल्याने भाविकांना घेता येणार दर्शन; चारधाम यात्रेचा झाला प्रारंभ