तुर्की : तुर्कस्तानमध्ये आज झालेल्या एकापाठोपाठ तीन भूकंपांनी पुर्ण देश हादरला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 2310 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढतोच आहे. तर, 10,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सीरियाच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी सरकार समर्थक रेडिओला सांगितले की हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होता. देशाच्या आग्नेय भागात ७.८ रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे. सध्या सर्वत्र बचाव कार्य सरु आहे. या भूकंपाचं केंद्र तुर्कस्तानमधल्या गाझियान्टेप शहराजवळ आहे. या भागातील लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे, त्यापैकी 5 लाख सीरियन निर्वासित आहेत. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूकंप कधी झाला : तुर्कस्तानच्या गाझिनटेप शहराजवळ 17.9 किमी खोलीवर पहाटे 4.17 वाजता भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपाचे धक्के लेबनॉन आणि सायप्रसमध्येही जाणवले. कहरामनमारस प्रांतातील पजारसिक जिल्ह्यात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तुर्कस्तानचे अंतर्गत मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गझियानटेप, कहरामनमारस, हताय, उस्मानिया, अदियामन, मालत्या, सानलिउर्फा, अदाना, दियारबाकीर आणि किलिससह 10 शहरे सर्वात जास्त प्रभावित झाली आहेत. येथे अनेक इमारती कोसळल्या आहेत. अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या सर्वत्र मदत कार्य सुरू आहे असही ते म्हणाले आहेत.
भारताची मदत : पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी तुर्कीला तातडीने मदत देण्याच्या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक बोलावली. शोध आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके तुर्कस्तानला पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.यासोबतच तुर्कस्तानला लवकरात लवकर मदत सामग्री पाठवण्यात येणार आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्यांमध्ये 100 जवान असतील. यामध्ये श्वानपथकांचाही समावेश आहे. याशिवाय हे पथक आवश्यक उपकरणेही सोबत घेऊन जाणार आहेत. वैद्यकीय पथकात डॉक्टर, इतर कर्मचारी आणि अत्यावश्यक औषधे असतील.