गांधीनगर : बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना बसने चिरडल्याने तब्बल 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना कलोल तालुक्यातील अंबिकानगर बस स्टँडजवळ आज सकाळी घडली. हा अपघात इतका भीषण होता, की बस स्टँडजवळ मृतदेहांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कसा झाला अपघात :कलोल येथील अंबिका नगर बसस्थानकाजवळ प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. यावेळी बस स्थानकाच्या बाहेर दुसरी एसटी बस उभी होती. या बसच्या पुढे प्रवासी दुसऱ्या बसची वाट पाहत होते. यानंतर आलेल्या बसने एस टी बसस्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या बसला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे रिकाम्या एसटी बसला धडक दिल्याने बस पुढे उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन धडकली. त्यामुळे बसच्या पुढे असलेल्या तब्बल 10 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या बसने प्रवाशांना चिरडल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. कलोल बसस्थानकावर झालेल्या या अपघातात १० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासगी बसने दिली एस टी बसला धडक :बस स्थानकावर उभ्या असलेल्या एस टी बसला खासगी बसने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कलोलचे पोलीस उपाधीक्षक पिली मानवडे, कलोलचे आमदार बकाजी ठकोर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार बकाजी ठाकोर यांनी यांनी आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.