नवी दिल्ली : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये रविवारी मोठा भीषण स्फोट ( Bomb blasts in Pakhtunkhwa ) झाला आहे. या स्फोटात 44 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, हा स्फोट खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये झाला आहे. जमियत उलेमा इस्लाम-फजल पक्षाची (JUI-F) परिषद सुरू असताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटात प्राण गमावलेल्यांची संख्या वाढू शकते, असे खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलिस महानिरीक्षक अख्तर हयात गंडापूर यांनी सांगितले आहे.
44 जणांचा मृत्यू 200 जण जखमी :पाकिस्तानी मीडियानुसार जमियत उलेमा इस्लाम फजलचा प्रमुख नेता मौलाना झियाउल्लाह जान यांचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांताचे पोलिस महानिरीक्षक अख्तर हयात गंडापूर यांनी सांगितले की, जखमींना पेशावर आणि तिमरगेरा येथील रुग्णालयात नेण्यात येत आहे. या घटनेत सुमारे 200 लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा जवानांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. बचाव पथकाचे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी सांगितले की, 5 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
जखमी रुग्णालयात दाखल : JUI-F चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या पक्षाने जारी केलेल्या निवेदनात या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, स्थानिक सरकारकडे या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रेहमान यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच जेयूआय-एफच्या कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचून रक्तदान करण्याचे आवाहन केले.