पुंछ (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. पुंछमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. तसेच ग्रेनेडने जोरदार हल्ला केला. यामुळे वाहनाला भीषण आग लागली. यात पाच जवान शहीद झाले आहेत. सुरुवातीला ही आग इतर अन्य कारणांमुळे लागल्याची शक्यता होता. मात्र, आता हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्च ऑपरेशन सुरू - दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यानंतर लागलेली आग एवढी भीषण होती की, जवानांना बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचवेळी वाहनामध्ये किती जवान होते याची माहिती घेतली जात आहे. सध्या या भागात लष्कर व पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
राजनाथ सिंहांनी घेतली माहिती - लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांना गुरुवारी जोरदार ग्रेनेड हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली आहे. सिंह यांनी याबाबतची सविस्तर माहिती लष्करप्रमुखांकडून घेतली आहे.