नवी दिल्ली -माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. कोरोनाशी लढण्याचे मुख्य माध्यम म्हणजे देशात लसीकरण वाढविणे आहे. लसींच्या संख्येवर नव्हे तर देशाच्या लोकसंख्येनुसार लसीकरणाच्या टक्केवारीवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मनमोहनसिंग यांनी पत्रात म्हटले आहे. सध्या भारताने देशातील काही लोकांनाच लस टोचवली आहे. योग्य योजनेमुळे आपण लसीकरण अधिक चांगले करू शकतो, अशी खात्री असल्याचे सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांनाही लस टोचवण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
सर्वप्रथम सरकारने आगामी सहा महिन्यातील लसीकरणाची माहिती जनतेला द्यावी. आगामी सहा महिन्यांत लसीचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेल्या लस उत्पादकांना किती ऑर्डर देण्यात आल्या आहेत, हे सरकारने सांगावे. तसेच लक्ष्यित लोकांचे लसीकरण करायचे असेल, तर आपण पुरेशा प्रमाणात ऑर्डर द्यावी, जेणेकरून उत्पादक वेळेवर पुरवठा करतील, असे मनमोहन सिंग म्हणाले.
फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा प्रवर्गाचा निर्णय घेण्याची परवानगी राज्यांना दिली पाहिजे. त्यामुळे 45 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जाऊ शकते, असे सिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. सर्व राज्यांना लसींच्या डोसांच कशा प्रकारे पुरवठा केला जाईल, हे सांगावे, असे सिंग यांनी पत्रात म्हटलं.
भारत सर्वात मोठा लस उत्पादक देश -
गेल्या काही दशकांत भारत सर्वात मोठा लस उत्पादक म्हणून उदयास आला आहे. यातील बहुतांश क्षमता खासगी क्षेत्रात आहे. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत भारत सरकारने लस उत्पादकांना मदत केली पाहिजे. जेणेकरून उत्पादन क्षमतेचा वेग वाढवता येईल, असे सिंग म्हणाले. तसेच कंपन्यांना निधी व सवलत देण्याचा सल्लाही सिंग यांनी सरकारला दिला.