नवी दिल्लीः मणिपूरमधील हिंसाचार अजून थांबलेला नाही. मणिपूर हिंसाचाराची झळ आता दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या निवासास्थानापर्यंत पोहोचली आहे. मणिपूर राज्यातील हिंसाचार प्रकरणी मणिपूरमधील कुकी जमातीच्या महिलांनी अमित शाह यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने निदर्शने केली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला.
गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने का केली : काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी मणिपूरचा दौरा केला होता. राज्यात शांती प्रस्थापित होईल असे आश्वासन दिले होते. तरीही तेथील हिंसाचार थांबलेला नाही. यामुळे कुकी जमातीच्या महिलांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केले. आंदोलन करणाऱ्या महिलांनी सांगितले की, शांती निर्माण केली जाईल, असे सांगितल्यानंतरही मणिपूरमध्ये त्यांच्या जमातीच्या लोकांवर हिंसाचार केला जात आहे. मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल कुकी समुदायाचे लोक संतप्त आहेत. मणिपूरमध्ये सततच्या हिंसक घटनांनंतर अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळेच शांततेची मागणी करत आम्ही शांततेत गृहमंत्र्यांना भेटायला आलो आहोत.