नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहे. यादरम्यान 19 जुलै रोजी मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला होता. देशवासीयांच्या संतापाचा कडेलोट करणाऱ्या या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका झाली. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय म्हणजे केन्द्रीय अन्वेषण ब्यूरो करणार आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील पडसाद पाहता गृह मंत्रालयाने चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच या प्रकरणाची सुनावणी मणिपूरऐवजी आसाममध्ये होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मणिपूरमध्ये एका विशिष्ट समुदायातील दोन महिलांना दुसऱ्या समाजातील कुप्रवृत्तीच्या व्यक्तींनी विवस्त्र करून त्यांची धिंड काढली होती. ही घटना 4 मे रोजी घडली होती. धिंड काढत असताना महिलांचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला होता. दरम्यान ज्या मोबाईलवरुन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, तो फोन जप्त करण्यात आला आहे. सीबीआयचा प्रकरणाचा तपास करणार असल्याने त्यांच्याकडे तो मोबाईल फोन जमा करण्यात आला आहे.
केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती: केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मणिपूरमधील माणूसकीला काळिमा फासणाऱ्या व्हिडिओ प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत केला जाईल. तसेच महिलांबाबत होणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याबाबत सरकारची भूमिका 'शून्य सहनशीलतेची' असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारने दिला आहे. अशा प्रकारचे घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना कठोर शासन केले जाईल.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, अशा घटनांचा घृणास्पद असा उल्लेख केला आहे. या घटनांकडे सरकार अतिशय गांभीर्याने पाहत असून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देण्याबरोबरच पीडित व्यक्तींना न्याय देणे आवश्यक आहे. जेणेकरून देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध होईल, गुन्हेगारी वृत्तीला चाप बसेल, असे सरकारने नमूद केले आहे. तसेच या प्रकरणाचा खटला मणिपूरच्या बाहेर हस्तांतरित करावा. त्याचबरोबर सहा महिन्यांच्या आत योग्य पद्धतीने हा खटला चालवला गेला पाहिजे, अशी विनंती केंद्राने न्यायालयाकडे केली आहे.