इंफाळ : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आज मोइरांगमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी मदत छावण्यांना भेट देतील आणि तेथील बाधित लोकांची भेट घेणार आहेत. यासोबतच ते 10 समविचारी पक्षाचे नेते आणि नागरी संस्थांच्या सदस्यांचीही भेट घेणार आहेत. शांतता ही एकमेव प्राथमिकता असायला हवी, असे राहुल गांधी यांनी यापूर्वी एका ट्विटमध्ये म्हटले होते.
,
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा :आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हिंसाचाराच्या काळात राहुल गांधींचा मणिपूर दौरा म्हणजे माध्यमांमधील प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिपूरमधील दुःखद परिस्थितीतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही सरमा म्हणाले. राहुल गांधी यांच्या एकदिवसीय दौऱ्याने परिसरात काहीही बदल होणार नाही, असे ते म्हणाले.