नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत अनेक विरोधी पक्षांनी राज्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती केली. मात्र, सरकारने याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही. काँग्रेस आणि इतर काही पक्षांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली, तर काही विरोधी पक्षांनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या बैठकीला भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
राज्यात शांततेसाठी प्रयत्न चालू - शाह : सरकारने बैठकीत सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असल्याचे सांगितले. बैठकीनंतर भाजपचे मणिपूर प्रभारी संबित पात्रा यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. पात्रा यांच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्र्यांनी बैठकीत असेही सांगितले की, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून असा एकही दिवस गेला नसेल की जेव्हा त्यांनी पंतप्रधान मोदींशी परिस्थितीबद्दल चर्चा केली नसेल किंवा पंतप्रधानांनी सूचना दिल्या नसतील.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मे रोजी उसळलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत सुमारे 120 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या बैठकीला औपचारिकता सांगून काँग्रेसने म्हटले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने गांभीर्याने पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा तातडीने घ्यावा. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी मौन सोडले पाहिजे, असे म्हटले आहे.