इंफाळ :आदिवासी आणि मेईतेई या दोन समाजात उफाळून आलेल्या आंदोलनानंतर मणिपूरमध्ये दंगल भडकली आहे. त्यामुळे सरकारने आंदोलक दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश ( Shoot At Sight ) जारी केले आहेत. सरकारने तब्बल 9 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र आदिवासी आणि मेईतेई समाजातील दंगलीवर नियंत्रण मिळणे कठीण झाल्याने सरकारने शूट अॅट साईटचे आदेश जारी केले. त्यासह सरकार कलम 355 लागू करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सध्या सरकारने आसाम रायफल्सच्या 55 तुकड्यांसह लष्करी तुकड्यांनाही तैनात केले आहे.
केंद्र सरकारने पाठवले रॅपिड अॅक्शन फोर्स :मणिपूरमध्ये दंगल उफाळून आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. ही दंगल पुन्हा भडकल्यास लष्कराने 14 तुकड्या तैनातीसाठी स्टँडबायवर ठेवल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली आहे. केंद्र सरकारही मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्राने ईशान्येकडील राज्याच्या हिंसाचारग्रस्त भागात तैनातीसाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ही दंगल हाताळण्यासाठी विशेष दलाची टीम पाठवली आहे. रॅपिड अॅक्शन फोर्स इंफाळ विमानतळावर दाखल झाले आहे.
काय आहे दंगलीचे प्रकरण :मणिपूरमध्ये नागा आणि कुकी हा आदिवासी समुदाय आहे. मात्र सरकारने बहुसंख्य मेईतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बुधवारी 'आदिवासी एकता मार्च' काढण्यात आला होता. यावेळी मेईतेई समुदायाने या मार्चला विरोध करत हल्ले सुरू केले. त्यामुळे दंगल भडकली.