नवी दिल्ली -मणिपूर हिंसाचार अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. रोज नवीन घडामोडी मणिपूरमध्ये घडत आहेत. याला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यातही मणिपूरचा मुद्दा गाजत आहे.
मणिपूरमध्ये घडलेला सर्व विषय सर्वांसमोर आहे. त्यामुळे त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. विरोधकांना पाहिजे तोपर्यंत मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
अमित शाहांचे पत्र - मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली आहे. सरकार मणिपूर हिंसाचार या संवेदनशील विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. तसे पत्र लोकसभा आणि राज्यसभा विरोधी पक्षांना शाह यांनी लिहिले आहे.
विरोधकांची लोकसभेत घोषणाबाजी - मणिपूर मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, घोषणाबाजी करणाऱ्या नेत्यांना सहकार्य करण्यात रस नाही असे वाटते. मात्र, मी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिली आहेत की सरकार पाहिजे तोपर्यंत चर्चेसाठी तयार आहे.
अमित शाहांचे स्पष्टीकरण - सरकारला कशाचीच भीती वाटत नाही. ज्यांना मणिपूरच्या मुद्द्यावर वाद घालायचा आहे ते वाद घालू शकतात. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे अमित शाह म्हणाले. तसेच सरकार हे मणिपूर या अतिसंवेदनशील विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याचेही अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -
- Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात महिलांची ढाल; जमावाने जाळली रिकामी घरे, शाळेलाही लावली आग
- Manipur Violence : स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत पेटवले; घरात राहिली फक्त राख, अन् हाडे, नात अन् सुनेने सांगितला घटनेचा थरार