इम्फाळ :मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सशस्त्र जमावाने स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला घरात बंद करुन जीवंत पेटवून दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांना बचावासाठी गेलेल्या नातीवरही समाजकंटकांनी गोळीबार केला. ही घटना 28 मे रोजी सेरो या गावात घडली असून ती आता उघडकीस आली आहे. इबेतोम्बी माईबी असे समाजकंटकांनी जिवंत जाळलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीचे नाव आहे. त्यांचे पती चुराचंद सिंग यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. दरम्यान या घटनेचा इबेतोम्बी माईबी यांची नात आणि सुनेने थरारक अनुभव कथन केला.
समाजकंटकांनी घरावर केला हल्ला :सेरो गावातील इबेतोम्बी माईबी यांच्या घरावर सशस्त्र जमावाने 28 मे रोजी हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या घरात त्यांची नात प्रेमकांता, सून तम्पक्षणा यांच्यासह नातेवाईक होते. समाजकंटकांनी सशस्त्र हल्ला केल्यानंतर इबेतोम्बी माईबी यांनी आपल्या नातेवाईकांना घरातून सुरक्षितस्थळी पळून जाण्यास सांगितले. इबेतोम्बी माईबी यांचे वय 80 वर्ष असल्याने त्यांना घरातून पळून जाणे शक्य नसल्याने त्या घरातच पडून होत्या. तुम्ही सुरक्षितस्थळी पोहोचल्यानंतर मग मला वाचवण्यास या, असा निरोप त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना देऊन घरातून काढून दिले होते. मात्र तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.
इबेतोम्बी माईबीची जळालेली हाडे अन् राख उरली मागे :इबेतोम्बी माईबी यांनी त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षितस्थळी पाठवल्यानंतर सशस्त्र जमावाने त्यांच्या घराला घेरले. यावेळी जमावाने त्यांना घरात बंद करुन घराला आग लावून दिली. या आगीत इबेतोम्बी माईबी यांची फक्त राख अन् हाडेच उरली. घरात स्वातंत्र्यसैनिक असलेले त्यांचे दिवंगत पती एस चुराचंद सिंग यांचे अर्धवट जळाले स्मृतीचिन्ह, अनेक मौल्यवान वस्तू, जळालेले घरगुती साहित्य आणि भिंतीवरील गोळ्यांचे छिद्र एका भयानक घटनेची साक्ष देत आहेत. जेव्हा सशस्त्र हल्लेखोरांनी आमच्या घरावर हल्ला केला, तेव्हा माझ्या सासूने मला आणि इतर शेजाऱ्यांना पळून जाण्यास सांगितले. हल्लेखोर तेथून निघून गेल्यावर परत या किंवा मला सोडवण्यासाठी कोणीतरी पाठवा, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी आणि इतर तीन कुटुंबांचे शेजारी पळून आल्याची माहिती इबेतोम्बी माईबी यांची सून एस. तम्पक्षाना यांनी वृत्तसंस्थेला दिली.