इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सोमवारी काही लोकांनी घरांना आग लावली. त्यानंतर तणाव वाढल्याने संपूर्ण परिसरात लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू शिथिल करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. आता सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत कर्फ्यू शिथिल राहील. पूर्वी ही वेळ संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होती.
तीन संशयितांना अटक : खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले उचलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोणीही सोशल मीडियाचा दुरुपयोग करू नये आणि चुकीचे फोटो प्रसारित करू नये तसेच प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत, यासाठी काही कठोर पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लष्करानेही या परिस्थितीवर आपले निवेदन जारी केले आहे. तीन संशयितांना अटक करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.
आतापर्यंत एकूण 74 लोकांचा मृत्यू : सोमवारी सकाळी 10.30 वाजता पूर्व इंफाळच्या न्यू चेकॉन मार्केटमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हाणामारीही झाली. जमावाने काही लोकांची घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 3 मे रोजी चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागातही हिंसाचार उसळला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत एकूण 74 लोकांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण वाद? : मणिपूरमध्ये मैतेई आरक्षणावरून वाद सुरू आहे. त्यांची लोकसंख्या मणिपूरच्या लोकसंख्येच्या निम्मी आहे. पण ते मणिपूरच्या फक्त 10 टक्के क्षेत्रापुरते मर्यादित आहेत. ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात. येथील उच्च न्यायालयाने मैतेईंचा अनुसूचीत जमातींच्या यादीत समावेश करण्याचे आदेश सरकारला दिले होते. तेव्हापासून हा हिंसाचार सुरू आहे. मैतेई समुदायाचे म्हणणे आहे की त्यांची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ते राज्याच्या लोकसंख्येच्या 62 टक्के होते. पण आता ते 50 टक्क्यांच्या आसपास पोहोचले आहेत. त्यांचा विरोधात नागा आणि कुकी समाज आहेत. ते प्रामुख्याने राज्याच्या डोंगराळ भागात राहतात. मात्र त्यांनी सुमारे 90 टक्के भौगोलिक क्षेत्र व्यापले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मैतेईंचा अनुसूचीत जमातींच्या यादीत समावेश करण्याच्या विरोधात आहेत.
काँग्रेसची भाजप सरकारवर टीका : या संपूर्ण घटनेवर काँग्रेस सेवादलाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजप सरकारवरही टीका केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Pak FM Bilawal visits PoK : पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची पीओकेला भेट
- Satyapal Malik On Lok Sabha Elections : 2019 च्या लोकसभा निवडणुका सैनिकांच्या मुद्द्यावर लढल्याचा सत्यपाल मलिकांचा आरोप
- G20 Srinagar summit : G20 बैठकीसाठी मोठ्या संख्येने येणार प्रतिनिधी, 'ही' आहेत उद्दिष्टे