इंफाळ Manipur Violence :मणिपूरमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. येथील हिंसाचारात आतापर्यंत १५० हून अधिक जणांचा जीव गेला असून अनेक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी एक वेगळाच दावा केला. 'मणिपूरमधील सध्याचा संघर्ष दोन समाजांमधील नाही. हे म्यानमार आणि बांगलादेशातील कुकी अतिरेक्यांनी येथे कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांच्या सहकार्यानं भारताविरुद्ध चालवलेलं युद्ध आहे', असं ते म्हणाले.
हत्येप्रकरणी जलद कारवाईचं कौतुक केलं : मणिपूरमध्ये एका मुलीसह दोन तरुण विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं चार संशयित आरोपींना अटक केली आहे. याचा संदर्भ देत बिरेन सिंह यांनी भारतीय सैन्य, निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांसह तपास संस्थेनं केलेल्या जलद कारवाईचं कौतुक केलं. तसेच दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकारच्या ठाम भूमिकेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
हा हिंसाचार अशा लोकांनी भडकावला ज्यांना राज्याचे तुकडे करायचं आहेत. परंतु दाखवलं असं गेलं की हा जातीय किंवा सांप्रदायिक संघर्ष आहे. लोकांनी या विरोधात आवाज उढवल्यानं खरं कारण समोर आलं असं ते म्हणाले. हा मुद्दा भारताविरुद्धच्या युद्धाचा असल्यानं केंद्र सरकार याला सामोरं जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल-मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह
नियमांचं पालन करण्याचं आवाहन : दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सुरुवातीला दोन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र दोन अल्पवयीन मुले असल्यानं त्यांना इम्फाळ विमानतळावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं. यासह आंदोलनं, मोर्चे काढताना संबंधित उपायुक्तांची परवानगी घेण्यासारखे कायद्याचे नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नियमांचं पालन केल्यास आंदोलक आणि सुरक्षा दलांमधील गैरसमज व संघर्ष टाळता येऊ शकतो, असं ते म्हणाले.
ITLF चं बंदचं आवाहन : दरम्यान, मणिपूरमधील आदिवासींची सर्वोच्च संस्था असलेल्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने रविवारी दोन अल्पवयीन मुलासह ७ कुकींचं अपहरण केल्याच्या निषेधार्थ चुराचंदपूर जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी बंद पुकारला. ITLF ने एनआयए आणि सीबीआयला ४८ तासांच्या आत त्यांची सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. सुटका झाली नाही तर मणिपूरच्या सर्व डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल. तसेच कोणालाही बफर झोनमध्ये प्रवेश करण्याची किंवा सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आज (सोमवार) पासून सर्व सरकारी कार्यालयं बंद राहतील, असं ITLF चे प्रवक्ते गिन्झा वुअलझोंग यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव वाढला, संतप्त आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न
- Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 175 लोकांचा मृत्यू, 1 हजार 108 जखमी