महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात महिलांची ढाल; जमावाने जाळली रिकामी घरे, शाळेलाही लावली आग

मणिपूरमधील हिंसाचारात अनेक नागरिकांचा बळी गेल्यानंतरही हा हिंसाचार अद्याप सुरूच आहे. आता या हिंसाचारात समाजकंटक महिलांना ढाल करुन गोळीबार करत आहेत. चुराचंदपूर येथे महिलांना ढाल करुन समाजकंटकांनी 10 घरांसह एक शाळा जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Manipur Violence
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 24, 2023, 11:28 AM IST

इम्फाळ : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर मणिपूरमधील हिंसाचाराची देशभरात चर्चा सुरू आहे. मात्र मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला दोन समुदायांमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. बिष्णुपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबुंग बाजार भागात सशस्त्र हल्लेखोरांनी किमान 10 रिकामी घरे आणि एक शाळा जाळल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा हिंसाचार अद्यापपर्यंत चिघळत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांना ढाल करुन जाळली शाळा :मणिपूरमधील हिंसाचार अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. आता समाजकंटक महिलांना ढालकरुन हिंसाचार पसरवत आहेत. मानवी ढाल म्हणून काम करणाऱ्या शेकडो महिलांच्या नेतृत्वाखालील जमावाने शनिवारी संध्याकाळी हल्ल्यादरम्यान अनेक राऊंड गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलांच्या नेतृत्वाखालील जमावाने तोरबुंग बाजारातील चिल्ड्रन्स ट्रेझर हायस्कूलला आग लावल्याची माहिती एका स्थानिक व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यामुळे आता समाजकंटक महिलांना पुढे करुन हिंसाचार पसरवत असल्याचे दिसून येत आहे.

जमावाने हिसकावले बीएसएफचे वाहन :मणिपूरमधील हिंसाचाराचे नेतृत्व लाखो महिला करत आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना कारवाई करताना अडथळे येत आहेत. आम्ही हल्लेखोरांना येताना पाहिल्यानंतर आम्ही सर्व घाबरलो आणि प्रत्युत्तर देण्यास कचरल्याची माहिती येथील एका स्थानिक नागरिकाने दिली. जमावाचे नेतृत्व शेकडो महिला करत होत्या. यावेळी संतप्त जमावाने बीएसएफचे वाहन हिसकावून आमची घरे जाळल्याचे त्यांनी यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. हा हिंसाचार थांबवला पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नंतर जमावाने बीएसएफचे कॅस्पर वाहन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सैन्याने आणि परिसरात तैनात असलेल्या स्थानिक स्वयंसेवकांनी प्रत्युत्तराच्या कारवाईने हा प्रयत्न हाणून पाडल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मेईतेई समाजाला आदिवासी दर्जा देण्यास विरोध : मणिपूरमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 50 हजारांहून अधिक नागरिकांना छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. मणिपूर उच्च न्यायालयाने मेईतेई समाजाला आदिवासी दर्जा देण्याचा आदेश दिला आहे. मात्र मेईतेई समाजाला आदिवासी दर्जा देण्यास कुकी समाजाचा विरोध आहे. नागा आणि कुकी यांना मेईतेई समाजाला एसटीचा दर्जा मिळावा असे वाटत नाही. कुकी समाजाने 3 मे रोजी मोर्चा काढून याबाबत निषेध केला होता. मात्र त्यांच्या रॅलीवर हल्ला झालामुळे त्यानंतर सुरू झालेला हिंसाचार आजतागायत सुरू आहे.

हेही वाचा -

  1. Manipur Violence : स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीला जमावाने जिवंत पेटवले; घरात राहिली फक्त राख, अन् हाडे, नात अन् सुनेने सांगितला घटनेचा थरार
  2. Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची आणखी एक घटना उघडकीस, स्वातंत्र्यसैनिकाच्या विधवेला हल्लेखोरांनी जिवंत जाळले

ABOUT THE AUTHOR

...view details