नवी दिल्ली :मणिपूरमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू आहे. नुकताच 4 मे चा महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, 'राज्यात शांतता प्रस्थापित करणे' हे त्यांचे मुख्य काम आहे. ते म्हणाले की '...मला त्याच्या राजकारणात जायचे नाही. राज्यात शांतता प्रस्थापित करणे हे माझे काम आहे. प्रत्येक समाजात उपद्रवी घटक असतात, पण आम्ही त्यांना सोडणार नाही'.
'मुख्यमंत्र्यांचा अजब तर्क' :मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले की, 'या घटनेचा राज्यभरात लोक निषेध करत आहेत. ते आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. काल अटक करण्यात आलेल्या आरोपीचे घर काही महिलांनी जाळले होते. मणिपूरी समाज महिलांवरील गुन्ह्याच्या विरोधात आहे. ते महिलांना माता मानतात. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सरकारला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आहे', असे त्यांचे म्हणणे आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया : या घटनेवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले की, त्यांना जूनमध्ये अनेक तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यांनी त्या राज्य प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठवल्या होत्या. मात्र सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरच्या व्हायरल व्हिडिओवर महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा म्हणाल्या की, 'आम्ही मणिपूर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मणिपूर सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावे लागेल'. रेखा शर्मा यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना फोन केल्याचा खुलासाही केला आहे.