अमरावती :आंध्र प्रदेशच्या तिरुपतीमध्ये एका व्यक्तीसोबत अजब प्रकार घडला आहे. कोर्लागुंटा येथे राहणारा हा व्यक्ती, बेवारस कोरोना मृतांना माती द्यायला गेला होता. यावेळी त्याच्यासमोर त्याच्याच आईचा मृतदेह आला. यामुळे स्थानिक रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कुटुंबातील सर्वांना झाली होती कोरोनाची लागण..
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी देवी (६२), त्यांचा मुलगा सुरेंद्र आणि सून या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर लक्ष्मी यांना स्थानिक मॅटर्निटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर सुरेंद्र आणि त्याच्या पत्नीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्णालयातील खर्च परवडत नसल्यामुळे हे दाम्पत्य दोन दिवसांमध्येच घरी परतले. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय लक्ष्मी देवी यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे सुरेंद्रला आपल्या आईची तब्येत कशी आहे हेदेखील माहित पडत नव्हते.
कोरोनातून बरा झाल्यानंतर २९ मे रोजी सुरेंद्र मॅटर्निटी रुग्णालयात गेला. तिथे वॉर्ड व्हॉलेंटिअर आणि प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या आईचा १९ मे रोजीच मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या आईला बेवारस समजून एका स्वयंसेवी संस्थेला त्यांचा मृतदेह देण्यात आला होता, असेही सुरेंद्रला सांगितले.