सुरगुजा (छत्तीसगड) -एक बाप आपल्या 7 वर्षीय लेकीच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन जात ( Man carrying body of daughter Chhattisgarh ) असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. ही घटना सुरगुजा जिल्ह्यातली होती. याप्रकरणी आता राज्याचे आरोग्य मंत्री टी.एस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. मुलीचा मृत्यू शुक्रवारी सकाळी लखनपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात झाला होता. शव वाहन येण्याच्या अगोदरच मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह नेला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा -Ukraine Russia War 31st Day : युक्रेन-रशिया युद्ध एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे - जो बायडेन
अमदाला गावातील रहिवासी ईश्वर दास यांनी आपली आजारी मुलगी सुरेखा हिला लखनपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पहाटे आणले होते, असे अधिकारी म्हणाले. मुलीची ऑक्सिजन पातळी खुपच कमी होती, 60 इतकी होती. तिच्या पालकांनुसार तिला गेल्या काही दिवसांपासून खूप ताप होता. आवश्यक उपचार देण्यास प्रारंभ झाला, मात्र तिची प्रकृती खालवली आणि 7.30 ला तिचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य केंद्रात कार्यरत ग्रामीण वैद्यकीय सहाय्यक डॉ. विनोद भार्गव यांनी दिली. शव वाहन लवकर येईल असे आम्ही मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. ती 9.20 च्या सुमारास आली, मात्र तोपर्यंत ते मुलीच्या मृतदेहासह निघून गेले, अशी माहिती त्यांनी दिली.