कोलकाता -गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये वाढ होत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीविरोधात अनोख्या रीतीने निषेध नोंदवला. ममता बॅनर्जी इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून राज्य सचिवालय 'नाबन्ना' येथे पोहचल्या. त्यांचे हे स्कूटर राज्य सरकारचे मंत्री आणि कोलकाता महापौर फिरहाद हकीम चालवत होते. मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसल्या होत्या.
पश्चिम बंगाल राज्यात पेट्रोल 100 रुपये लिटरच्या पुढे गेले आहे. याचा निषेध नोंदवत ममता बॅनर्जी यांनी हाजरा मोड ते राज्य सचिवालयदरम्यानचे पाच किलोमीटर ऐवढे अंतर इलेक्ट्रिक स्कूटरवर बसून पार केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेले लोक मुख्यमंत्र्यांना अभिभावदन करताना पाहायला मिळाले. नियामानुसार दोघांनीही हेल्मेट घातले होते. पेट्रोल दरवाढ, डिझेलची दरवाढ आणि गॅसची दरवाढ' असे लिहिलेला एक फलकही दीदींनी आपल्या गळ्यात परिधान केला होता.