कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमधील कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेता ममता यांनी पंतप्रधानांकडून कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मदत मागितली आहे. आपल्या दोन पानांच्या पत्रात ममता यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालसाठी कोरोना लसीचे आणखी 5.4 कोटी डोस देण्यास सांगितले आहे.
'लसीकरण सर्वात महत्वाचे आहे. राज्यात, विशेषत: कोलकातामध्ये, लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे जलद लसीकरण आवश्यक आहे. दुर्दैवाने आमच्यासाठी भारत सरकारकडून लसींचा पुरवठा कमी व अनिश्चित आहे, यामुळे राज्यातील लसीकरणावर नकारात्मक परिणाम होत आहे. आम्हाला 2.7 कोटी लोकांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी सध्या राज्याला 5.4 कोटी डोस आवश्यक आहेत, असे दीदींनी पत्रात म्हटलं आहे.