कोलकाता : विश्वभारती विद्यापीठात असलेल्या नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या घराच्या जागेचा वाद सुरू आहे. या वादात आता ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. अमर्त्य सेन यांचे घर पाडल्यास आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा ममता बॅनर्जी यांनी विश्वभारती विद्यापीठाला दिला आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जीनी अमर्त्य सेन यांच्या विश्वभारती विद्यापीठातील जमिनीची कागदपत्रे अमर्त्य सेन यांना दिली होती. यानंतरही अमर्त्य सेन यांच्या घराच्या जागेवरुन सुरू असलेला वाद संपला नाही.
विश्वभारती विद्यापीठाने बजावली नोटीस :नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना विश्वभारती विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी जागा सोडण्याची नोटीस बजावली होती. यानंतर बुद्धिजीवी नागरिकांनी अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या छळ करण्यात येत असल्याचा दावा केला. मात्र आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विश्वभारतीविरुद्धच्या लढ्यात थेट अमर्त्य सेन यांची बाजू घेतली आहे. अमर्त्य सेन यांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न झाला, तर आपण आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.