नवी दिल्ली INDIA Meeting : विरोधकांच्या 'इंडिया' (I.N.D.I.A.) आघाडीच्या नेत्यांची चौथी बैठक आज (१९ नोव्हेंबर) दिल्लीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि आरएलडीचे नेते जयंत चौधरी उपस्थित होते.
पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव सुचवलं : सूत्रांनुसार, या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी याला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जींच्या या प्रस्तावाला कोणाचाही विरोध नव्हता, असं एमडीएमके खासदार वायको यांनी बैठकीनंतर सांगितलं. मात्र, या प्रश्नावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मौन बाळगलं आहे.
२८ विरोधी पक्ष सहभागी : 'इंडिया' आघाडीच्या चौथ्या बैठकीत २८ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. बैठकीत, देशभरात किमान ८-१० बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारमध्ये खासदारांना संसदेतून निलंबित केले जात आहे. हे अलोकतांत्रिक आहे. यासाठी सर्वांना एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.