कोलकाता Mamata Banerjee : राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील भारताच्या पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं होतं. 'पनौती' (नरेंद्र मोदी) मुळे आपण फायनल हरलो, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपानं यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी : आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापेक्षा धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ममता बॅनर्जी गुरुवारी म्हणाल्या की, "टीम इंडियानं विश्वचषकाचा अंतिम सामना वगळता सर्व सामने जिंकले, कारण अंतिम सामन्याला 'पापी लोक' उपस्थित होते". याशिवाय, "फायनल मॅच अहमदाबाद ऐवजी कोलकाता किंवा मुंबई येथे आयोजित केली असती तर टीम इंडियानं ट्रॉफी जिंकली असती", असंही त्या म्हणाल्या.
भगव्या रंगाच्या जर्सी वरून टीका : भारतीय खेळाडूंना भगव्या रंगाच्या जर्सी दिल्या जात असल्याची टीकाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली. हा रंग भाजपशी संबंधित आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "भारतीय खेळाडूंना याला विरोध केला आणि विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये नेहमीच्या निळ्या रंगाच्या जर्सी परिधान केल्या. तर भगव्या रंगाच्या जर्सी सराव सामन्यांमध्ये परिधान केल्या जात होत्या", असं त्या म्हणाल्या.
खेळाचं राजकारण केल्याचा आरोप : भाजपावर खेळाचं राजकारण केल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "सर्व महासंघ भाजपानं ताब्यात घेतले आहेत. क्रिकेट, कबड्डी सगळीकडे भगवा आहे. 'भगवा रंग त्यागींचा असतो, मात्र तुम्ही (भाजपा) 'भोगी' आहात", असं त्या म्हणाल्या. गेल्या आठवड्यात, बॅनर्जी यांनी भाजपावर भारतीय क्रिकेट संघासह संस्थांचं भगवेकरण केल्याचा आरोप केला होता. सर्व काही भगव्याकडे वळलं जात असल्याचं सांगून त्या म्हणाल्या की, "टीम इंडियाच्या सराव जर्सी पूर्वी निळ्या रंगाच्या होत्या. आता त्या भगव्या रंगात बदलल्या आहेत".
हेही वाचा :
- "आपण विश्वचषक जवळपास जिंकलाच होता, मात्र 'पनौती'मुळे...", राहुल गांधींची मोदींवर नाव न घेता टीका