कोलकाता : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या या यशावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अगोदर नाव न घेता काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र आता ममता बॅनर्जींनी प्रादेशिक पक्ष मजबूत असलेल्या ठिकाणी त्यांनी भाजपविरोधात लढावे, इतरांनी त्यांना मदत करावी, असे स्पष्ट केले आहे. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी आपण काँग्रेसला मदत करू, मात्र आपल्या विरोधात काँग्रेसने लढू नये, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
मजबूत प्रादेशिक पक्ष भाजपशी लढेल, इतरांनी मदत करावी :कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. जेथे प्रादेशिक राजकीय पक्ष मजबूत असेल तिथे भाजप लढू शकत नाही. विशिष्ट प्रदेशात जे पक्ष मजबूत आहेत, त्यांनी एकत्र लढले पाहिजे. मी कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा देत आहे, मात्र बंगालमध्ये काँग्रेसने माझ्याविरुद्ध लढू नये, असे त्यांनी सोमवारी राज्य सचिवालय नबन्ना येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
ममता बॅनर्जींनी सांगितला फॉर्म्युला :भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही बंगालमध्ये लढू. दिल्लीत आपने लढावे. बिहारमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरवून भाजपला टक्कर द्यावी, मी त्यांचा फॉर्म्युला ठरवू शकत नाही, असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. चेन्नईमध्ये एमके स्टॅलिनचा डीएमके आणि काँग्रेसची मैत्री आहे. त्यामुळे ते एकत्र लढू शकतात असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. झारखंडमध्ये जेएमएम आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेसने इतर राज्यातही प्रादेशिक पक्षाला जोडीला घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी फॉर्म्युला ठरवावा असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.