कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अमित शाह पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेले सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.
'अमित शाहांना गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार नाही' :ममता बॅनर्जींनी आज दुपारी राज्य सचिवालयात पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, 'बंगालमध्ये भाजपला 35 जागा मिळाल्या तर सरकार पडेल असे अमित शाह म्हणू शकत नाहीत. लोकशाहीचे आणि संघराज्य रचनेचे रक्षण करण्याऐवजी ते म्हणतात की आम्ही निवडून आलेल्या सरकारला पाडू. संविधानाचेही तेच आहे. तेही बदलले जात आहे. त्यांना इतिहास बदलायचा आहे. अमित शाहांना हे बोलण्याचा अधिकार नाही. असे बोलणाऱ्या व्यक्तीला गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार नाही.' गेल्या आठवड्यात अमित शाह यांनी एका रॅलीत म्हटले होते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये जर भाजपला 42 पैकी 35 जागा मिळाल्या तर 2025 च्या आधी तृणमूलचे सरकार पडेल.
'पुलवामा प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी' : जम्मू - काश्मीरचे माजी राज्यपाला सत्यपाल मलिक यांनी पुलवामावर दिलेल्या वक्तव्यावरून ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'आम्ही भारतीय सैन्याचा आदर करतो. आम्हाला त्यांच्या बलिदानाचा अभिमान आहे. आम्हाला पुलवामा प्रकरणाची संपूर्ण चौकशी हवी आहे'. बंगालमधील वाढत्या हिंसाचारावरूनही ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला. ममता म्हणाल्या की, 'मतमोजणी नंतरच्या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी 151 टीम पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आमच्या पक्षाच्या नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्यात आले. राम नवमीला नुकत्याच झालेल्या हिंसाचाराने मी हैराण झाले आहे'.
सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन : ममता बॅनर्जी यांनी पुढे सवाल केला की, 'बंगालमध्ये जेव्हा काही घडते त्याचा थेट संबंध सरकारशी नसतो, मात्र तरीही केंद्रीय पथक पाठवले जाते. पण जम्मू - काश्मीरच्या बाबतीत जवान शहीद झाल्याची घटनांनंतर तेथे किती केंद्रीय टीम पाठवल्या गेल्या?'. ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील अतिक आणि अशरफ हत्याकांडावरही प्रश्न उपस्थित केले. ममता म्हणाल्या की, 'उत्तर प्रदेशातील लोकांसाठी एन्काउंटर ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. राज्याच्या जनतेने या चकमकींना विरोध केला पाहिजे'. यासोबतच ममता बॅनर्जी यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :Kejriwal Fourth Pass King Story : 'चौथी पास राजा आणि बनावट पदवी'... केजरीवालांची विधानसभेत नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टोलेबाजी!