महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mallikarjun Kharge: काँग्रेसचा नवा अध्याय! मल्लिकार्जुन खरगेंची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. काँग्रेसच्या 9,800 नेत्यांनी मतदान केले होते. त्यापैकी 7,897 मते खर्गे यांच्या बाजूने पडली. त्याचवेळी त्यांचे विरोधक शशी थरूर यांना हजाराहून अधिक मतांवर समाधान मानावे लागले. 416 मते बाद झाली आहेत. थरूर यांनी आपला पराभव मान्य केला आहे. (Mallikarjun Kharge) त्यांनी ट्विट करून विजयाबद्दल खर्गे यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच त्यांनी हा पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा विजय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचा नवा अध्याय! मल्लिकार्जुन खरगेंची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
काँग्रेसचा नवा अध्याय! मल्लिकार्जुन खरगेंची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

By

Published : Oct 19, 2022, 1:49 PM IST

Updated : Oct 19, 2022, 4:00 PM IST

नवी दिल्ली - मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झालेत. त्यांना 7000 हून अधिक मते मिळाली आहेत. तर शशी थरूर यांना 1000 हून अधिक मते मिळाली आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांना सात हजारांहून अधिक मते मिळाली आहेत. थरूर यांना अवघ्या हजार मतांवर समाधान मानावे लागले. खर्गे अध्यक्ष झाल्याचा काँग्रेसला कितपत फायदा होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पक्ष बदलणार का? काँग्रेस पक्षातील गांधी घराण्याची मक्तेदारी खरोखरच संपुष्टात येईल का? अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. आता जवळपास २४ वर्षांनंतर खर्गे हे गांधी कुटुंबाबाहेरचे अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळणार आहेत.

शशी थरूर का हरले?या निवडणुकीत शशी थरूर यांच्या पराभवाचे कारण काय, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, दीर्घकाळ काँग्रेसचे राजकारण पाहणारे विनोद शर्मा याला जी-23 आणि जी-3 गटाची हिस्सेदारी कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, "शशी थरूर यांच्या पराभवाचे आणि खर्गे यांच्या विजयाचे कारण म्हणजे खर्गे यांनी गांधी परिवार आणि G-23 यांना एकाच व्यासपीठावर आणले आहे. ते गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांनी त्यांचे नाव पुढे केले. जेव्हा थरूर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी G-3 गटाकडे मदतीसाठी संपर्क साधला होता.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल -खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर येथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. येथे ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीसही होते. गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून एलएलबी केल्यानंतर त्यांनी कायद्याची प्रॅक्टिस सुरू केली. 1969 मध्ये ते MKS मील्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. त्यानंतर त्यांनी कामगारांसाठी लढा दिला. ते युनायटेड ट्रेड युनियनचे प्रभावी नेते होते.

2009 मध्ये पहिल्यांदा खासदार - १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांची लोकप्रियता पाहून पक्षाने त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केले. 1972 मध्ये ते पहिल्यांदा कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. खरगे गुरुमितकल मतदारसंघातून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही भूषवले. 2005 मध्ये त्यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 2008 पर्यंत ते या पदावर होते. 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

2020 मध्ये राज्यसभेवर - खरगे हे गांधी घराण्याचे विश्वासू मानले जातात. यासाठी त्यांना वेळोवेळी बक्षीसही मिळाले. 2014 मध्ये खर्गे यांना लोकसभेत पक्षाचे नेते बनवण्यात आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने त्यांना 2020 मध्ये राज्यसभेवर पाठवले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला तेव्हा खर्गे यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्यात आले.

मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली - खर्गे यांनी ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत १२ निवडणुका लढवल्या. त्यापैकी ११ मध्ये त्यांना विजय मिळाला. जवळपास ३२ वर्षे ते एकाच मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते. कर्नाटकच्या राजकारणामध्ये तीन वेळा त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी आली. मात्र प्रत्येक वेळी काही ना काही कारणांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावलणी दिली. मात्र त्यामुळे त्यांना हायकमांडवर नाराजी न दर्शवता पक्षाप्रति आपली निष्ठा कायम राखली.

इंदिरा गांधींविरोधात बंड -खर्गे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे राजकीय गुरू आणि माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांना साथ दिली होती. तसेच, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र काही काळातच ते काँग्रेसमध्ये परतले होते. १९६९ मध्ये काँग्रेमध्ये दोन गट पडले, तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे हे इंदिर गांधींसोबत होते. १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत देवराज अर्स यांच्या नेतृत्वाखालील इंदिरा गांधी गटाच्या काँग्रेस (आर) ने दणदणीत विजय मिळवला होता. खर्गेही निवडून आले होते. मात्र, कालांतराने अर्स आणि इंदिरा गांधी यांच्यात मतभेद झाले.

नेतृत्वाबाबत सहकाऱ्यांचा अपेक्षाभंग - १९७९ मध्ये अर्स यांनी काँग्रेस सोडली होती. तेव्हा त्यांच्यासोबत मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र पुढच्या लोकसभा निवडणुकीत अर्स यांच्या पक्षाला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली. तसेच त्यांच्या नेतृत्वाबाबत सहकाऱ्यांचा अपेक्षाभंग होऊ लागला. त्याकाळात मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसमध्ये माघारी परतले. त्यानंतर मात्र त्यांनी पक्षाशी एकनिष्ठता बाळगली. दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. तेव्हा गुलबर्गा येथून निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या लोकसभेतील नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता अशोक गहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतल्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे आलं. तसेच ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले.

गांधी घराण्यातील अध्यक्ष - मोतीलाल नेहरु - नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. मोतिलाल नेहरू हे १९१९, १९२८ असे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

जवाहरलाल नेहरु -जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. मोतीलाल नेहरु यांच्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे 1929 साली ही धुरा देण्यात आली.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधी -गांधी-नेहरु यांची तिसऱ्या पिढीत 1959 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 1974 ते 1984 या काळात त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चौथ्या पिढीत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं.

1998 साली सोनिया गांधींची निवड -राजीव गांधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सलग सात वर्षे नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्याकडून 1998 साली पुन्हा एकदा नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्याकडे आली. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नेहरु-गांधी कुटुंबात पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वात जास्त काळ कामकाज पाहिलं आहे. त्यांच्यानंतर आता राहुल गांधी यांच्या हातात पक्षाची धुरा देण्यात आली आहे.

आतापर्यंतचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत

Last Updated : Oct 19, 2022, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details