कोलकाता :इस्कॉनच्या पुजाऱ्याने एका सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मायापूरच्या इस्कॉन मंदिराच्या कार्यालयात घडली आहे. जगद्धात्री दास असे त्या सुरक्षा रक्षकावर अत्याचार करणाऱ्या पुजाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाने तक्रार दाखल केल्याने नवद्वीप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार पुजाऱ्याचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक इशानी पाल यांनी दिली आहे.
पुजाऱ्याने गोड बोलून केला घात :मायापूर इस्कॉन मंदिरात सुरक्षा रक्षक असलेल्या पीडितासोबत जगद्धात्री दास हा गोड गोड बोलत होता. सुरक्षा रक्षक त्याच्या गोड बोलण्याच्या व्यवहाराने खूश होता. काही दिवसांपूर्वी आरोपी जगद्धात्री दास याने सुरक्षा रक्षकाला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने पुजारी जगद्धात्री दास याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्या कार्यालयात गेला. मात्र यावेळी पुजारी जगद्धात्री दास याने सुरक्षा रक्षकाला त्याच्या रुममध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केले. आरोपी पुजारी जगद्धात्री दास हा इस्कॉन मंदिरात महत्त्वाच्या पदावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इस्कॉनच्या पुजाऱ्याने सुरक्षा रक्षकावर अत्याचार केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली.
कोणाला सांगितल्यास नोकरीतून काढण्याची धमकी :पुजारी जगद्धात्री दासने सुरक्षा रक्षकावर अत्याचार केल्यानंतर विविध आमिष दाखवून धमकावले. झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी जगद्धात्री दासने सुरक्षा रक्षकाला दिली. मात्र पुजाऱ्याने अत्याचार केल्यानंतर पीडित सुरक्षा रक्षक मानसिकदृष्ट्या खचला. दोन दिवसानंतरपीडित सुरक्षा रक्षकाने नवद्वीप पोलीस ठाण्यात आरोपी जगद्धात्री दास याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली.
अनेक सुरक्षा रक्षकांवर अत्याचार केल्याचा संशय :इस्कॉनचा पुजारी जगद्धात्री दास याने सुरक्षा रक्षकावर अत्याचार केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मात्र त्याचा हा पहिलाच कारनामा नसून त्याने अनेक सुरक्षा रक्षकांना आपल्या वासनेची शिकार केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र अनेक सुरक्षा रक्षकांना त्याने धमक्या देऊन गप्प बसवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवद्वीप पोलिसांनी या प्रकरणांचा शोध सुरू केला आहे.