नवी दिल्ली Maldives India Row : मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियावर पोस्टवर केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय. रविवारी भारतानं हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे उपस्थित केला. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. यानंतर मालदीव सरकारनं एक निवेदन जारी केलं. "हे मंत्र्यांचं वैयक्तिक मत आहे. या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत", असं या निवेदनात म्हटलंय.
काय आहे प्रकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपच्या त्यांच्या भेटीची छायाचित्रं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली होती. मोदींनी भारतीयांना या बेटाला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. मात्र भारतीय युजर्सच्या टीकेचा सामना करावा लागल्यानंतर शिउना यांनी ही पोस्ट हटवली. शिउना व्यतिरिक्त, मंत्री झाहिद रमीझ यांनी देखील सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीच्या छायाचित्रांची खिल्ली उडवली होती.