नवी दिल्ली Maldives Minister : मालदीव सरकारने पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आपल्या मंत्र्यांविरुद्ध कारवाई केल्याचं वृत्त आहे. सरकारनं मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान या मंत्र्यांना रविवारी निलंबित केल्याची ही बातमी आहे. भारताबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ निलंबित करण्यात आल्याचं वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र मालदीवचे उपमंत्री हसन झिहान यांनी स्थानिक माध्यमांच्या ट्विटचा हवाला देत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मंत्रिमंडळातून इतर मंत्र्यांसह निलंबनाच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसंच याला 'फेक न्यूज' म्हटलय. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.
पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट : मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. यानंतर भारतानं मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. यानंतर मालदीव सरकारनं एक निवेदन जारी केलं. हे या मंत्र्यांचं वैयक्तिक मत आहे. मंत्र्यांच्या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत, असं या निवेदनात म्हटलं होतं.