पुणे - कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला दुपारी एक वाजताच्या सुमारास आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. ही आग आता आटोक्यात आली असून, या दुर्घटनेत पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांतील औषधनिर्माण कारखान्यांमध्ये लागलेल्या आगींवर एक नजर टाकूयात...
हैदराबाद..
- १२ डिसेंबर २०२०ला हैदराबाद येथील विंद्या ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीला आग लागली होती. या आगीमध्ये दहा लोक जखणी झाल्याचे समोर आले होते. तसेच, ११ सप्टेंबर २०२०ला हैदराबादमध्येच आणखी एका औषधनिर्माण कंपनीला आग लागल्याची घटना घडली होती, ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
- २६ एप्रिल २०२०ला सुव्हेन फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीमध्येही आगीची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
- २४ फेब्रुवारी २०१८ला हैदराबादपासून जवळ असलेल्या जीडीमेटला येथील सेयुटिक फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला लागलेल्या आगीत मात्र, १० जण जखमी झाले होते. त्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर होती.
आंध्र प्रदेश..
- १४ जुलै २०२०ला आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे असलेल्या जे. एन. फार्मा सिटीमधील रामकी सीईपीटी सॉल्व्हंट कंपनीमध्ये आग लागली होती. यामध्ये सहा लोक जखमी झाले होते.
- ११ ऑगस्ट २०१९मध्ये आंध्रमधील श्रीकाकुलम येथे असलेल्या ऑरोबिंडो फार्मा या कंपनीला लागलेल्या आगीत दोन ठार तर एक जखमी झाले होते.
- २ मे २०१७मध्ये जे. एन. फार्मा सिटीमधील अझिको बायोफोर या कंपनीला आग लागली होती. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता, तर तीन जखमींची नोंद झाली होती.
- २८ सप्टेंबर २०१५मध्ये जे. एन. फार्मा सिटीमध्ये असलेल्या सैनॉर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागली होती. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते.
- ५ जानेवारी २०१५ला विशाखापट्टणममध्ये असणाऱ्या हेटेरो ड्रग्ज या कंपनीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला होता.
यासोबतच महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणामध्येही अशा घटना समोर आल्या होत्या.
- २८ डिसेंबर २०१६ला महाराष्ट्रातील अहमदनगर येथील सन फार्मा या कंपनीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते.
- ११ डिसेंबर २०१५मध्ये गुजरातच्या अंकलेश्वर येथे असणाऱ्या अंकलेश्वर जीआयडीसीमध्ये लागलेल्या आगीत तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर २ जण जखमी झाले होते.
- २० जानेवारी २०१३मध्ये तेलंगणाच्या मेडक येथे असलेल्या डॉ. रेड्डी या औषधनिर्माण कंपनीला आग लागली होती. या आगीत दोघांचा मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते.
हेही वाचा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिरमच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची करणार पाहणी