गाझियाबाद -केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडला आहे. गाझीपूर सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीत विविध राजकीय पक्षांचे नेते भेटी देत आहेत. आतापर्यंत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत. यातच आज महात्मा गांधी यांची नात तारा गांधी-भट्टाचार्य यांनी गाझीपूरच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला भेट दिली.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महात्मा गांधींची नात तारा गांधी भट्टाचार्य शनिवारी गाझीपूर सीमेवर पोहोचल्या. राकेश टिकैत, बलबीरसिंग राजेवाल, गुरनामसिंग चढूनी, दर्शन पाल, जगतरसिंग बाजवा आदी शेतकरी नेत्यांची भेट घेत, त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.