मुंबई -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विनायक दामोदर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विविध पक्षांचे नेते या विषयावर प्रतिक्रिया देत आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कायदेतज्ज्ञांमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी राजनाथ सिंह यांच्यावर टीकाही होत आहे.
संजय राऊत -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले, की विनायक दामोदर सावरकरांनी कधीही ब्रिटिशांची माफी मागितली नव्हती. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलेल्यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर काही करू शकू, असा विचार करून धोरण अवलंबू शकतात. राजकारणात किंवा तुरुंगवास भोगताना वेगळी रणनीती अवलंबली जाते. जर सावरकरांनी अशी कोणतीही रणनीती स्वीकारली असेल तर त्याला माफी म्हणता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे -
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे, ते म्हणाले की, सावरकर बहुतेक त्यांच्या बैठकीत आले असावेत. त्यांनी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
जयंत पाटील -
कोणी काही सांगितले म्हणून ब्रिटिशांपुढे माफीनामा सादर करण्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा पद्धतीची माहिती देऊन संघ आणि भाजपाने सावरकरांना पुन्हा-पुन्हा अडचणीत आणू नये. राजनाथ सिंह यांच्याकडे यासंदर्भात काही पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली आहे.
काँग्रेस, एआयएमआयएमची टीका
अंदमान तुरुंगात कैद असताना वि. दा. सावरकर यांनी ब्रिटीशांकडे महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच दया याचिका दाखल केली होती, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन, या उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये रूपा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. दरम्यान, यावरून एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही भाजपावर टीका केली आहे.
विकृत इतिहास मांडला जात आहे - ओवैसी
हे लोक विकृत इतिहास मांडत असल्याची टीका एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींऐवजी सावरकर हे राष्ट्रपिता आहेत, असे सांगतील. सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवन लाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
सावरकरांमुळे देशाचे विभाजन - बघेल
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. बघेल यांनी भारताच्या विभाजनासाठी सावरकरांना जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे, की देशाचे विभाजन करण्याचा पहिला प्रस्ताव सावरकरांनी दिला होता. जे नंतर मुस्लीम लीगने स्वीकारले. ते म्हणाले, की सावरकरांच्या प्रस्तावातून दोन राष्ट्रांचा सिद्धांत जन्माला आला. म्हणूनच देशाच्या फाळणीला सावरकर जबाबदार आहेत.
काय म्हणाले होते राजनाथ सिंह?
सावरकर यांच्याविरोधात अनेक खोट्या गोष्टी पसरवण्यात आलेल्या आहेत. सावरकर यांनी अंदमान निकोबार तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी ब्रिटिशांकडे दया याचिका दाखल केली होती, असे पसरवण्यात आले. मात्र, त्यांनी सुटकेसाठी दया याचिका दाखल केल्या नाही. सामान्यपणे एका कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. महात्मा गांधी यांनी सावरकर यांना दया याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती, असे राजनाथ सिंह म्हणाले.
सावरकर महान स्वतंत्रता सेनानी होते. त्यांना एका विशिष्ट विचारधारेच्या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. असे केल्यास त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल. त्यांचा अपमान करणे क्षमायोग्य नाही. सावरकर महानायक होते आणि भविष्यातही राहतील. ब्रिटिशांनी त्यांना दोनदा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यावरून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छा शक्ती किती मजबूत होती, हे दिसून येते. काही लोक त्यांच्यावर नाझीवाद, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात. मात्र, सत्य हे आहे, की असे आरोप करणारे लोक लेनिनवादी, मार्क्सवादी विचारधाराने प्रभावित होते आणि अद्यापही आहेत. सरळ शब्दात सांगायचे झाले तर सावरकर 'यथार्थवादी' आणि 'राष्ट्रवादी' होते. ते बोल्शेविक क्रांतीसोबतच लोकशाहीबद्दल बोलत, असे राजनाथ सिंह म्हणाले.
हिंदुत्वाबद्दल सावरकरांचे विचार हे भारताच्या भौगोलिक स्थान आणि संस्कृतीशी संबंधित होते. त्यांच्यासाठी हिंदू हा शब्द कोणत्याही धर्म, पंथाशी संबंधित नव्हता. तर भारताच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित होता. या विचारावर कोणी आक्षेप घेऊ शकतो. मात्र, विचाराच्या आधारावर तिरस्कार करणे योग्य नाही, असे सिंह म्हणाले.
हेही वाचा -गोवा विधानसभा निवडणूक : भाजपा-महाराष्ट्र गोमंतक पक्षाची राज्यात युतीसाठी तडजोड सुरू