पुणे - राज्यात थंडीचा कडाका कायम असणार आहे. तर पुढील पाच दिवसात विदर्भात पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. तर राज्यात थंडीची लाट काही दिवस कायम राहू शकते असे हवामान खात्याच्या आयएमडी पुणे शाख्येच्या प्रमुख के. एस होसाळीकर यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता -
3 आणि 4 फेब्रुवारी रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात बऱ्यापैकी मध्यम पाऊस/बर्फवृष्टी सुरू राहण्याची शक्यता आहे. ३ तारखेला हिमाचल प्रदेशात आणि ३ आणि ४ फेब्रुवारी २०२२ रोजी उत्तराखंडमध्ये गारपिटीची शक्यता आहे.
विदर्भातील पाऊस पडण्याची शक्यता -
पुढील पाच दिवस विदर्भातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांना फटका
गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे. शिवाय पहाटे पिकांवर दवबिंदू साचत असल्याने अनेक ठिकाणच्या पिकांसह फळबागांचे देखील नुकसान होणार आहे.
संसर्गजन्य आजारांची भीती
गेल्या 2 वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यातच संसर्गजन्य आजारांना सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून, यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना सारख्या आजाराला बळी पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा, घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवून राहावे. तसेच, कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे.
हेही वाचा -VIDEO : 'पल पल याद तेरी तडपावे'; हळदीत हातात तलवार घेऊन डांन्स, मित्रासह नवरदेव थेट पोलीस कोठडीत