नवी दिल्ली :भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, आणि इतर अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानुसार ( IMD ) आज उत्तराखंड, पूर्व आणि पश्चिम राजस्थान, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता :भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात, हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळ, महाराष्ट्राच्या किनारी पावसाची शक्यता :केरळ, महाराष्ट्राच्या किनारी भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासोबतच आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, किनारी कर्नाटक आणि केरळच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा, तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरातमध्ये पावसाचे थैमान :भारतीय हवामान विभागाने IMD जुनागढ, अमरेली, नवसारी, डांग आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 5 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सूनचा परिणाम आता अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. उत्तर भारतातील मैदानी आणि डोंगराळ भागात जोरदार पाऊस झाला. गुजरातसारख्या राज्यात पावसाने जोरदार थैमान घातल्याने पाणी तुंबण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.
हेही वाचा -
- Maharashtra Weather Update: रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना समाधानकारक पावसाची प्रतिक्षा
- Heavy Rain In Maharashtra: राज्यात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता