हैदराबाद -देशातचनव्हे तर, महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. त्यानंतर राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर आता एक मोठी घटना समोर आली आहे. लखनौहून मुंबईच्या दिशने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे आता महिला कुठेच सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात वाहनांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे झाले आहे. या घटनांची माहिती देणारा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.
हेही वाचा -शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर
राज्यात बस आणि ट्रेनमध्ये झालेले महिलांवरील अत्याचार प्रकरणे :
1) पुष्पक एक्सप्रेसमध्ये तरुणीवर अत्याचार
लखनौहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडला. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी (8 ऑक्टोबर 2021) घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश केला आणि १० ते २० प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला.
दोघे अटकेत
धक्कादायक बाब म्हणजे, या दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असून, २ दरोडेखोर ताब्यात घेतले आहे. तर ६ अद्यापही फरार असल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांना मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोहोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांच्या हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे, एका २० वर्षीय प्रवाशी तरुणीसोबत दरोडेखोरांनी छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, या दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.
2) भाजप नेत्याने बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
माजी भाजप नेता रविंद्र बावनथाडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
27 जुले 2017 रोजी नागपूरला जात असताना बावनथाडे याने माझ्यावर जबरदस्ती केली, असा पीडितेचा आरोप होता. बसमधील कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल झाल्यानंतर पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणानंतर भाजपने माहिती देत बावनथाडे याला काही महिन्यांपूर्वीच पक्षातून बाहेर काढल्याचे सांगितले.
बावनथाडे हा सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक असून व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या घटनेचा निषेध केला होता. आरोपीवर कारवाई होत असून दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असे ते म्हणाले होते.